मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि.12 (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार योजना जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या मार्फत राबविली जाते. सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हयातील विविध गावातील, शहरातील लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून आपला व्यवसाय सुरु करावा व स्वतः आत्मनिर्भर व्हावे तसेच आपल्या व्यवसायातून इतरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेमध्ये कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन, सेवा उद्योग, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाम मुद्रेवर (ब्रॅण्ड आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्रे, खाद्यान्न केंद्र इ.) घटक या योजनेत पात्र आहेत. यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वर्षे 45 आवश्यक. परंतु, अनुसूचित जाती/महिला/ अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल राहील. या योजनेमध्ये ज्यांचा प्रकल्प 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी इ.7 वी पास व ज्यांचा प्रकल्प 25 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी 10 वी पास आवश्यक आहे.
कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. तसेच नमूद अर्जदाराने इतर कोणत्याही शासनाच्या योजनेत लाभ घेतला नसावा. योजनेतील उत्पादन प्रकल्पासाठी प्रकल्प मर्यादा 50 लाख व सेवा उत्पादन प्रकल्पासाठी 10 लाख मर्यादा आहे. योजनेमध्ये अर्जदाराचे स्वभांडवल 5 ते 10 टक्के, शासनाचे आर्थिक सहाय्य अनुदान 15 ते 35 टक्के व उर्वरित 60 ते 75 टक्के बँकेचे कर्ज आहे.
योजनेत शहरी भागात अनुसूचित जाती/जमाती/ इ.मा.व./ विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्याक महिला /अपंग/ माजी सैनिक यांना 25 टक्के व ग्रामीण भागात नमूद प्रवर्गात 35 टक्के अनुदान असणार आहे. या शिवाय उर्वरित सर्व प्रवर्गासाठी शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण 25 टक्के अनुदान आहे. योजनेमध्ये 1 ते 2 आठवड्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँका शेड्युल बँका/ खासगी बँका व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या योजनेस पात्र आहेत.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र तसेच विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील वचन पत्र व प्रकल्प अहवाल इ. www.maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे, असेही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कळविण्यात येत आहे.