कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील गैरअर्जदारांविरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. यामध्ये 50 व 100 रुपयांचे स्टँप पेपरवरील 6 करारपत्र, 9 खरेदीखते असे महत्वपुर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे शिरोळ तालुक्यातील मौजे टाकळीवाडी येथील दोन गैर अर्जदारांविरुध्द सावकारी अंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये गैर अर्जदार धनपाल निगाणा भमाणे, सदाशिव धनपाल भमाणे व अजित आम्माण्णा गोरवाडे सर्व रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ यांच्या विरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मागर्दशनाखाली गैर अर्जदारांविरुध्द दोन ठिकाणी झडतीची कार्यवाही अधिन उप निबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले येथील सहकारी अधिकारी आर. जी. कुलकर्णी, व अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ येथील सहकारी अधिकारी व्ही. व्ही. वाघमारे यांच्या पथकाने पूर्ण केली. तथापि गैरअर्जदार अजित आम्माण्णा गोरवाडे हे बाहेरगावी असल्याने त्यांचे राहते घर सिल करण्यात आले आहे. गैरअर्जदार धनपाल निगाप्पा भमाणे व सदाशिव धनपाल भमाणे यांच्या राहत्या घरातून 50 व 100 रुपयांचे स्टँप पेपरवरील 6 करारपत्र, 9 खरेदीखते असे महत्वपुर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
या कार्यवाहीसाठी सहकार विभागाचे 2 अधिकारी व 14 कर्मचारी असे 16 कर्मचा-यांची व पोलीस अधिकारी व 4पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती. झडतीमध्ये प्राप्त झालेल्या अवैध सावकारीचे दस्त ऐवज, करारपत्रे यांचे चौकशीचे काम सुरु आहे.
अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.