तपासणीसाठी पथके स्थापन करा
कोल्हापूर, दि.12 (जिमाका): पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी, प्राणी तसेच मानवास दुखापत होते. तसेच पर्यावरणाची हानी होते. जिल्ह्यात कोणीही नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करु नये, असे आवाहन करुन नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नायलॉन मांजा खरेदी, विक्री, वापरावर निर्बंध घालण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी तहसीलदार संतोष कणसे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मकरसंक्रांत सणादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. तथापी, नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवास होणारी इजा, तसेच पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाची खरेदी करु नये, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
नायलॉन मांजा विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी पथके स्थापन करुन दुकानांची तपासणी करा, मांजा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा मांजाच्या खरेदी, विक्री, वापर व वाहतूकीवर निर्बंध आणा. शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करा, अशा सूचना त्यांनी केल्या