भन्नाट न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि 12
वीर गाथा प्रोजेक्ट 2.0 मध्ये देशभरातील पंचवीस सर्वश्रेष्ठ विजेत्यामध्ये फरहानचा समावेश.
• वीस लाख स्पर्धकांमधून निवडल्या गेलेल्या पंचवीस विजेत्यामधील महाराष्ट्रातला एकमेव शालेय विद्यार्थी.कोल्हापूर (प्रतिंनिधी) : देशसेवेला वाहून घेतलेला सैनिक या विषयाची आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून आशयघन पद्धतीने मांडणी करत विरगाथा प्रोजेक्ट 2.0 मध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या तेरा वर्षीय फरहान राजमंहमद मकानदार या विद्यार्थ्याचा देशभरातील पंचवीस सर्वश्रेष्ठ विजेत्यामध्ये समावेश झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये संरक्षण मंत्रालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या वतीने ही स्पर्धा झाली होती. यामध्ये बाजी मारत फरहानने हा मान पटकावला आहे. तो उंचगांव (ता. करवीर) येथील नॅशनल अकॅडेमी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आहे.
चित्रकला, द्रकश्राव्य कथन (व्हिडिओ बाइट), काव्यरचना सादरीकरण आणि सारांशलेखन अशा प्रकारात ही स्पर्धा झाली होती. यामध्ये चित्रकला विषयातून फरहानने आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून फरहान देशभरातील पंचवीस सर्वोत्कृष्ठ विजेत्यांपैकी एक ठरला. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते फरहानला सन्मानित करण्यात येणार आहे. फरहानसोबत त्याचे एक पालक यांना या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा संरक्षण मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे. फरहानला या यशासाठी त्याची आई व शाळेतील शिक्षिका सौ. राबिया मकानदार आणि शाळेचे संचालक नासर खान यांचे मार्गदर्शन तर शाळेचे संस्थापक हाजी अस्लम सय्यद यांचे प्रोत्साहन लाभले. शाळेचे संस्थापक, संचालक, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.