भन्नाट न्युज नेटवर्क
“ऑपरेशन” आणि “हल्ला” यातील फरक रुग्णांना कधी समजणार?
यवतमाळ जिल्ह्यातील चाकू हल्ल्याने डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.
कोल्हापूर दि 7-एखादे ऑपरेशन करायला आयुष्याची कित्येक वर्षे खर्ची घालून मेहनतीने डॉक्टर व्हायला लागते आणि एखाद्या डॉक्टरांवर चाकू हल्ला करायला केवळ मानसिक विकृती.
वैद्यकीय सेवा देताना एखादे ऑपरेशन रुग्णाला नवसंजीवनी देणारे असते परंतु अश्या प्रकारचा भ्याड हल्ला करून या विकृत आणि निर्दयी लोकांना समाजाला काय संदेश द्यायचा आहे?डॉक्टरांवर होणारे हल्ले जरी नवीन नसले तरी या सर्व प्रकारांची आता शासनाने गंभीर दखल घेऊन डॉक्टर सुरक्षेसाठीचा कायदा कडकपणे अमलांत आणला पाहिजे.यवतमाळ मध्ये दोन डॉक्टरांना चाकू हल्ल्यात गंभीर जखमी व्हावे लागले आहे.आधीच देशामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सरासरी डॉक्टरांच्या तुलनेत अगदी नगण्य डॉक्टर देशामध्ये काम करीत असताना असे प्रकार होऊ लागले तर भविष्यात आपली मुले डॉक्टर होऊ नयेत अशी भावनाच वाढीला लागते की काय अशी चिंता वाटू लागली आहे.
कोरोना काळामध्ये हेच डॉक्टर सर्वांना देवदूत वाटत होते.आपला रुग्ण घेऊन बेड मिळेपर्यंत हॉस्पिटल च्या दारात अक्षरशःवाट बघत बसायचे की जेणे करून आपला घरचा सदस्य लवकरात लवकर बरा होईल.पण आता लोकांना त्याची किंमतच राहिली नाही असेच म्हणावे लागेल.जर डॉक्टरांच्या वर असेच हल्ले होत राहिले तर आत्ताचे डॉक्टर आपल्या मुलांना डॉक्टर करतील का?लोकांची सेवा पण करायची जीव पण धोक्यात घालायचा हे कोणालाही न रुचणारे आहे.या डॉक्टरांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण?
या हल्ल्याने आता महाराष्ट्र शासनाने जोरदार पावले उचलून अश्या लोकांना कडक शासन करणे गरजेचे आहे.आणि जर शासनाला काहीच जमणार नसेल तर सर्व डॉक्टरांना सरळ कायदेशीर रित्या आत्मसंरक्षण करणेसाठी बंदुकीचे परवाने देऊन डॉक्टरांनी आता बंदूकच स्वतःजवळ बाळगून वैद्यकीय उपचार देण्याशिवाय पर्याय नाही,असेच म्हणावे लागेल.मग त्यांना अश्या लोकांचा जागेवरच “बंदोबस्त” करता येईल.कारण “कापणे” खूप सोपे असते “शिवणे” अवघड असते नाहीतर आयुष्यच “फाटते”.
या सर्व प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्व जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन व संघटनांनी याचा तीव्र निषेध चालू केला आहे.यामध्ये समाज सदैव त्यांच्या सोबत असल्याचे दिसून येते. याबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.