कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : जिल्हा परिषदेकडील गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची सन २०२१ अखेरची संभाव्य जेष्ठता यादी तयार केली आहे. या यादीवर काही हरकती, दुरुस्ती असल्यास तसेच ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अशांनी या बाबतची पुर्तता दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहून करण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) मनीषा देसाई यांनी केले आहे.
सन २०२१ अखेरची संभाव्य जेष्ठता यादी सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी तयार केली असून त्यामध्ये उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर २०२१ अखेर एकूण ५७ व त्यापूर्वीचे एकूण ५० असे १०७ उमेदवारांचे अर्ज सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषदेकडे नियुक्ती करीता प्रलंबित आहे. यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in संकेत स्थळावर दि. 3 जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती, दुरुस्ती यांचा विचार केला जाणार नाही, असेही श्रीमती देसाई यांनी कळविले आहे.