वादावादीने प्रवासी हैराण
भन्नाट न्यूज नेटवर्क
कोल्हापुर दि 26
कोल्हापुरातील रिक्षाचालक म्हणजे कोल्हापूरचा स्वाभिमान यांच्या प्रामाणिकपणामुळे कित्येक लोकांना दिलासा मिळाला आहे.मग रिक्षात विसरलेली बॅग वा मौल्यवान गोष्टी असो की गणपतीला मोफत रिक्षा सेवा असो कोल्हापूरचे रिक्षाचालक नेहमीच अग्रेसर असतात.तसेच रस्त्यासाठी महापालिकेला घेराव घालून सर्वांना चांगले रस्ते मिळावेत म्हणून आंदोलन करणारे आपलेच रिक्षाचालक. त्यामुळे नित्याने अशा रिक्षाचालकांचा सत्कार होत असलेले आपण पाहतो.
परंतु काही मुजोर रिक्षाचालकांच्या मूळे या सर्व गोष्टींना गालबोट लागत असल्याचे दिसत आहे.रात्रीच्या वेळी अगदी 1 वाजलेनंतर शासनाच्या नियमानुसार मीटर प्रमाणे होणाऱ्या भाड्याच्या दीडपट भाडे घेण्याचा अधिकार रिक्षाचालक यांना असताना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात काही रिक्षाचालक रात्री अपरात्री आलेल्या प्रवाश्यांकडे अगदी तिप्पट पैशाची मागणी करताना दिसत आहेत.मग एखाद्याने मीटर प्रमाणे जे काही होईल ते नियमानुसार घ्या म्हटल्यावर मीटर बंद असल्याचे कारण देऊन अरेरावी करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जातो.
एका रिक्षाचालकाने तर कहरच केला एका प्रवाश्याला तो म्हणतो की “5 रुपयात तयार होणारा वडा 20 रुपयाला घेता ते चालते मग आम्हाला का देत नाही आम्हीपण दोन तास रांगेत उभारतो नंबरसाठी.मग प्रवाशाने, रिक्षा कशाला चालवता वडापाव ची गाडीच टाका ना म्हटल्यावर पुढे काय होईल हे सांगायला नको.
प्रवासी मात्र रात्री अपरात्री बाहेरगावाहून आल्याने आधीच थकलेला असतो तो काही हुज्जत न घालता तयार होतो.पण अशा मुजोर रिक्षाचालकांच्या कडून होणारी पिळवणूक कोल्हापूरच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे.यावर प्रादेशिक परिवहन विभाग काही कारवाई करणार आहे का?असा सवाल केला जात आहे.याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क केला असता त्यांनी अशा रिक्षाचालक यांच्या रिक्षाचे नंबर घेऊन त्या बाबत परिवहन विभागाकडे तपशीला सह ऑनलाइन तक्रार प्रवाश्यांना करता येते असे सांगितले.त्यानुसार संबंधित रिक्षाचालकावर कायद्यानुसार कारवाई करता येऊ शकते.त्यासाठी
transport.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन तक्रार दाखल करावी.