दि. ०९/०९/२०२४ कला आणि सांस्कृतिक नगरी अशी करवीर नगरीची ओळख आहे. ही ओळख नव्या पिढीमध्ये जोपासली जावी, या क्षेत्राविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी आणि एकूणच कला संस्कृती क्षेत्राला चालना देण्यासाठी, सौ. वैष्णवी महाडिक यांच्याकडून कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची घोषणा, आज पत्रकार परिेषदेत करण्यात आली. या सेंटरच्यावतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच, मर्दानी खेळांची जोपासना केली जाणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. तर चॅनेल बी कडूनही अनेक कार्यक्रम सादर होतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सौ. वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्यावतीने कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची स्थापना करण्यात आली आहे. या संबंधीची घोषणा आज सौ. वैष्णवी महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली. या सेंटरच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमांसह, मर्दानी खेळांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, या सेंटरच्यावतीने २५ युवती- महिलांचा सहभाग असणारे लेझिम पथक तयार करण्यात आले आहे. सेंटरच्यावतीने श्रीधर फडके यांचे गीत रामायण, महेश काळे यांची स्वरसंध्या गीतांचा कार्यक्रम, योगदिन, गर्भसंस्कार शिबीर, टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स एक्स्पो यासह अन्य विविध कार्यक्रम राबवले आहेत. या पथकाचे सादरीकरण २५ सप्टेंबर रोजी होणार्या झिम्मा फुगडी स्पर्धेत केले जाईल. लेझिमसह मर्दानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांच्या प्रशिक्षणासाठी आणि महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीरे सेंटरच्यावतीने आयोजित केली जाणार आहेत, असे सौ. वैष्णवी महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक उपस्थित होत्या.