कोल्हापूर दिनांक 8 -आज नोकरीसाठी विविध क्षेत्रात प्रत्येक उमेदवाराला अनुभव विचारला जातो. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सहभागी मुख्यमंत्री योजनादुतांमार्फत केले जाणार आहे. कोणत्याही नोकरीसाठी संवाद कौशल्य, देह बोली, आत्मविश्वास आणि सामान्य ज्ञान अनिवार्य असते. या उपक्रमातून सहभागी तरूणांना आपल्याच भागात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवत असताना या आवश्यक कौशल्यांमध्ये वाढ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जाणून घेवूया या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाबाबत……*
राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर 1 तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने राज्यात 50 हजार योजनादूत 6 महिन्यांसाठी नेमले जाणार आहेत. तर फक्त कोल्हापूर जिल्ह्यात 2400 योजनादूतांची निवड केली जाणार आहे.
*सामाजिक कामही आणि मिळणार मोबदलाही* : सामाजिक जीवनात आपल्या अवतीभोवती अनेक गरजू मुलंमुली, तरूण, महिला पुरूष यांचा वावर असतो. शासनाने अनेक लोक कल्याणकारी योजनांमधून अशा घटकांना समान स्तरावर आणण्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांना लोकोपयोगी योजना माहिती व्हाव्यात आणि त्यांना त्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून या उपक्रमातून माहिती दिली जाणार आहे. गरजू कुटुंबांना मदत देण्याचे काम हे योजनादूत करणार आहेत. मोबाईल ॲप्लीकेशन व शासनाच्या माहिती पुस्तिकेतून अगदी सहज प्रत्येक योजना गरजुपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मुख्यमंत्री योजनादूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे. ज्याद्वारे सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. एकदा योजनादूत म्हणून निवड झाल्यावर महिन्याला 10,000/- रू.मासिक विद्यावेतन दिले जाणार. उमेदवाराला त्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यात दर महिन्याला निश्चित तारखेला विद्यावेतन मिळेल. विद्यावेतन मिळविण्यास पात्र होण्यासाठी महिन्यातून किमान 20 दिवस काम करणे आवश्यक आहे. हा फक्त इंटर्नशिप प्रोग्राम असल्यामुळे शासनामध्ये नियमित रोजगाराची हमी देणार नाही. तथापि, खाजगी क्षेत्रात समान भूमिका मिळविण्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरु शकतो. इंटर्नशिप आणि विहित मूल्यमापन यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, राज्य सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल. ज्याचा उपयोग निश्चितच भविष्यात उमेदवारांना होईल.
*कौशल्यांमध्ये वाढ करण्याची संधी* : नोकरीसाठी आज संवाद कौशल्य, देह बोली, आत्मविश्वास आणि सामान्य ज्ञान अनिवार्य असते. योजनादूत या उपक्रमातून सहभागी तरूणांना आपल्याच भागात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवत असताना या कौशल्यांमध्ये वाढ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. समाजातील विविध घटकांसोबत बोलताना वेगवेगळया पैलुंचा विकास होवून बोलणे, प्रश्न विचारणे, उत्तरे देणे याबाबत नवनवीन अनुभव घेता येणार आहे. संवाद कौशल्याचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात किती महत्त्वपुर्ण आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. प्रत्येकाचा आत्मविश्वास शरीराच्या हालचालींवरून निदर्शनास येतो. एक चांगला उत्साह, देह बोलीतून स्पष्ट होतो. समाजात बसताना उठताना आपण लोकांशी कसे बोलतो यावर बरेच अवलंबून असते. या ठिकाणी कित्येक लोकांबरोबर आपल्याला सामोरे जाताना देह बोलीचा विकास करण्याची, ती अधिक जवळून अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. सामान्य ज्ञान, यात पुस्तकांमधून शिकलेल्या ज्ञानाव्यतिरीक्त बऱ्याच घटकांची भर पडणार आहे. समाज जीवन, विविध योजना यांसह माणसांचे राहणीमान, त्यांचा दिनक्रम, त्यांचे प्राधान्यक्रम अशा अनेक बाबींची माहिती अनुभवातून मिळणार आहे. या संधीचा उपयोग करून घेतल्यास निश्चितच तरूणांना विविध कौशल्यांसह जीवनोपयोगी अनुभव मिळतील अशी आशा आहे.
*योजनादूत साठी अशी करा नोंदणी* : या उपक्रमात सहभागी होण्यास आपण उत्सुक असल्यास, www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध संधी शोधू शकता आणि अर्ज करू शकता. तसेच नोंदणीच्या वेळी कोणत्याही समस्या, शंकेचे निराकरण करण्यासाठी, पोर्टलवर दिलेल्या हेल्प डेस्क ईमेलवर संपर्क साधा. नोंदणीसाठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे. तर वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. वय जन्मतारीख ते 01 जानेवारी 2024 पर्यंत मोजले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचे स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. योजनादूत इंटर्नशिपचा कमाल कालावधी 6 महिने असेल. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र, सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवासाचा दाखला, उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा अथवा संबंधित संकेतस्थळावरील हेल्प डेस्क ईमेलवरून मदत घेता येईल.