कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २४०० योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून आज रविवारी सकाळ पर्यंत १५५ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.
*कोल्हापूर जिल्ह्यात २४००योजनादुतांची होणार निवड-* प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २४०० योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
*योजनेचे स्वरुप -* प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
*आवश्यक पात्रता-* या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे -* मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क -* १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
०००००००