कोल्हापूर – अनेक घरगुती श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसात विसर्जन होते. ८ सप्टेंबर या दिवशी असणार्या या विसर्जनासाठी मात्र महापालिकेच्या वतीने प्रचंड अनास्था दिसून आली. पंचगंगा नदीकाठी आणि परिसरात ठिकठिकाणी कचरा, निर्माल्य यांचे ढिग होते. मध्यंतरी पाणी वाढून परत ते खाली गेल्यानंतर जी स्वच्छता होणे अपेक्षित होती ती झालेली नव्हती. सगळ्यात धक्कादायक म्हणजे नदीशेजारील असलेल्या एका नाल्याचे-भुयारी गटारीचे पाणी वाहत येऊन ते पंचगंगा नदीत मिसळत होते. यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला.
या संदर्भात जुना बुधवार अन्याय निवारण समितीने एक आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांना पंचगंगा स्मशानाची स्वच्छता करा, श्रीगणेश आगमनापूर्वी रस्त्यांमधील खड्डे बुजवा असे निवेदन दिले होते. या निवेनावर महापालिकेडून कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही. पंचगंगा नदीवर आल्यावर एके ठिकाणी ‘बॅरीकेटस्’ तसेच आढळून आले.यामुळे तेथे येणार्या भाविकांना त्रास होत होता. पंचगंगा नदीकाठावर गेली अनेक वर्षे पुढाकार घेऊन आरती करणारे श्री. स्वप्नील मुळे यांनाही महापालिका प्रशासन कसल्याही प्रकारचे साहाय्य करत नाही.
नदीकाठावर भाविकांनी देवतांच्या प्रतिमा ठेवल्या असून ठिकठिकाणी गौरीच्या मूर्तीही विसर्जित न करता काठावरच ठेवलेल्या आढळल्या.
शहरातही अनेक रस्त्यांवर खड्डे दिसून आले ज्यामुळे भाविकांना श्री गणेशमूर्ती नेतांन कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी तर रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ता’ हेही कळत नव्हते.