शिरोली, ता. १७ – रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसीच्या वतीने सामजिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व्होकेशनल अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कृष्णात खोत, अपंगत्वावर मात केलेल्या सोनाली नवांगुळ यांच्यासह आर्थिक साक्षरतेवर कार्य करणारे डॉ. विजय ककडे, होमिओपॅथीमध्ये कार्यरत डॉ. श्रीकांत लंगडे व इतिहास अभ्यासक, शिवशाहीर राजू राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
नागाळा पार्क येथील रोटरी सेवा भवन येथे रोटरी क्लब ऑफ शिरोलीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स ऑफिशियल व्हिजिट बैठकीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वरील मान्यवरांचा सत्कार डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै, असिस्टंट गव्हर्नर गौरी शिरगावकर, अध्यक्ष, सीए सुनील नागावकर व सचिव अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी क्लबच्या फिजिओथेरपी सेंटरला भेट देऊन अल्पशा खर्चामध्ये सर्वसामान्य लोकांना फिजिथेरपीच्या सेवा पुरविल्या जातात. यातून हजारो रुग्णांना झालेला लाभ याची माहिती घेतली. या वर्षात रोटरी क्लबच्या वतीने जगभरात सर्वत्र समाजोन्नती प्रकल्प राबविले जातात. यामध्ये पाणी वाचवा आणि मधुमेह हटविण्यासाठी प्रयत्न, असे प्रकल्प घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. गौरी शिरगवाकर यांनी रोटरी क्लब शिरोलीच्या कार्याचा आढावा घेतला. रोटरीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत कसे पोहचता येईल याविषयी मार्गदर्शन केले. सीए सुनील नागावकर यांनी येणाऱ्या काळात रोटरीच्या माध्यमातून वृक्षारोपण, आर्थिक साक्षरता, मधुमेह लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सांगितले. सचिव अनिल पाटील यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन वारणा वडगावकर यांनी केले. सचिव अनिल पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डिस्ट्रिक्ट इंडोमेंट सेक्रेटरी निरंजन जोशी, मोहन मुल्हेरकर यांच्यासह रोटरी सभासद परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू राऊत यांच्या भूपाळीने मंत्रमुग्ध
यावेळी कोल्हापूर चे सुप्रसिध्द इतिहासकार शिवशाहीर राजू राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिजिटल शाहिरीच्या माध्यमातून पोवाडा आणि भूपाळीच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.