कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोलकता येथील आरजी.कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेने कनिष्ठ डॉक्टरांमध्ये लक्षणीय असंतोष पसरला आहे. ही महिला डॉक्टर दुसऱ्या वर्षाचे पल्मोनोलॉजी शाखेचे वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्यावर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे. विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी पुरेशा सुरक्षिततेचा अभाव आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे येथे प्रकर्षाने जाणवते.
याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने (केएमए) न्याय आणि सुधारित कामकाजाच्या मागण्यांसाठी एकजुटीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक १७ ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता सीपीआर येथून मुक मोर्चा निघणार आहे.या मूक मोर्चाची सांगता ताराराणी चौक कावळा नाका येथे अकरा वाजता होणार असून कोल्हापुरातील सर्व वैद्यकीय संघटनांनी यात सहभागी व्हावे, खाजगी तसेच सरकारी डॉक्टर्सनी अत्यावश्यक सेवा वगळता क्लिनिक बंद ठेवावे आणि काळी फीत लावून तसेच एप्रन घालून यात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर यांनी केले आहे. तसेच आज पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबद्दलचे निवेदन देऊन उद्याच्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच रविवारी दिनांक १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत बिंदू चौक येथे एप्रन घालून काळ्या फिती लावून मेणबत्ती पेटवून निषेध नोंदवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना प्रशिक्षणार्थी डॉक्टर, खाजगी व सरकारी डॉक्टर तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.