अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना वरिष्ठांकडे दाद मागणार.
कोल्हापूर दिनांक 22 – रामानंदनगर येथील बालाजी पार्क परिसरामध्ये ओॲसिस कॉम्प्लेक्स जवळ री.स. नं.786 बी वॉर्ड येथे साळवी नावाच्या गृहस्थाने अतिक्रमण करून बांधकाम केल्याच्या तक्रारी नागरिकांनी महानगरपालिकेकडे दाखल केल्या आहेत.त्याअनुषंगाने कोमनपा च्या अधिकाऱ्यांनी रीतसर पाहणी करून संबंधिताला अतिक्रमित बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती.परंतु त्या नोटीसला केराची टोपली संबंधित इसमाने दाखवल्याने महनगरपलिकेने सदरचे बांधकाम पाडणार असून हे काम करताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुना राजवाडा पोलिसांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.परंतु आजतागायत जुना राजवाडा पोलिसांनी याबाबत काहीही प्रतिसाद न दिल्याने नागरिकांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.सदरच्या अतिक्रमित बांधकामातून तो इसम जवळपास 50000 रुपये भाड्यापोटी घेत असल्याचे समजते.सदर जागेत त्याने 4 दुकान गाळे काढून ते भाड्याने दिल्याचे समजते.त्यामुळे संबंधित इसम राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा सुध्दा होताना दिसत आहे.त्यामुळे सदरचे अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेला त्वरित पोलीस बंदोबस्त द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे समजते.