कोल्हापूर, दि. 8(जिमाका) : राष्ट्रीय कौशल्य अर्हता आराखड्यानुसार कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आणि उद्योजकता शिक्षण व महाराष्ट्र राज्यातील कौशल्य पाठ्यक्रमाशी संबधित असणा-या बाबीचे नियमन करण्यासाठी आणि तत्संबधीत किंवा तद्नुषंगिक इतर बाबींसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी व विधी संस्थापीत करण्यासाठी 26 जानेवारी 2022 पासून महाराष्ट्र अधिनियम राज्यात अंमलात आला आहे. सन 2024-25 या प्रशिक्षण सत्रापासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविण्यासाठी नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम, तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतचे वेळापत्रक विभागाच्या https://msbvet.edu.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कोल्हापूर, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्यात व्यवसाय शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी शासनाव्दारे मान्यता देण्यात येते व मंडळाव्दारे संलग्नता प्रदान करण्यात येते. संलग्नीत संस्थामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची मंडळाव्दारे परीक्षा घेण्यात येवून उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येते. मंडळाव्दारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची यादी, सविस्तर अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांचे वैशिष्टय, अभ्यासक्रमाची समकक्षता, संबधित शासन निर्णय, माहिती पुस्तिका, अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक इ. सर्व माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सन 2024-25 या प्रशिक्षण सत्रापासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविण्यासाठी नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम, तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतचे वेळापत्रक –
नवीन संस्था व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम तुकडी सुरु करण्यारीता संबंधीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत -दिनांक 29 फेब्रुवारी 2024.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयांनी संस्थाकडून प्राप्त प्रस्तावांची तपासणी व प्रत्यक्ष निरीक्षण करुन संस्थांचा मूळ प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्यासाठी अंतिम दिनांक- दि. 15 मार्च 2024.
प्रादेशिक कार्यालयांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तांवाची तपासणी करुन संस्थांचा मूळ प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल मंडळास सादर करण्यासाठी अंतिम दिनांक -31 मार्च 2024 व मंडळाने प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावाची तपासणी करुन मान्यता प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी अंतिम दिनांक – 15 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे.