कोल्हापूर दिनांक२९: कळत-नकळतपणे हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणार्या, कुटुंबाच्या मायेच्या ओलाव्यापासून वंचित असलेल्या आणि कारागृह हेच विश्व बनलेल्या कळंबा जेलमधील शेकडो कैद्यांसाठी आजचा दिवस मायेची उधळण करणारा, कौटुंबिक नात्यांची जाणीव करुन देणारा आणि मनाबरोबरच डोळ्यांच्या कडाही पाणावणारा ठरला. बुधवारच्या रक्षा बंधनाचे औचित्य साधून, कोल्हापुरातील भागिरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी कळंबा जेलमधील बंदीजनांना राख्या बांधल्या. आणि कळंबा जेलच्या भिंतीही भावूक झाल्या.माणूस प्रेमाचा, मायेचा भुकेला असतो. दिवसभर तो कुठंही फिरत असला तरी घरी परतल्यानंतर कुटुंबातील सदस्यांकडून मिळणारी माया, प्रेम त्याला नवी ऊर्जा देत असते. पण कारागृहाच्या चार भिंतींच्या आत शिक्षा भोगणार्या बंदीजनांना कुटुंबाचे प्रेम, माया कुठून मिळणार. गुन्ह्याची शिक्षा भोगताना अनेक कैद्यांना क्षणोक्षणी आपल्या कुटुंबाची, नातेवाईकांची आठवण येत असते. पण या भावना कुणाजवळ व्यक्त करणार, हा प्रश्न अनुत्तरित असतो. मात्र आज अशा शेकडो बंदीजनांना बहिणीची माया, प्रेम आणि जिव्हाळा यांचे दर्शन घडवले ते भागिरथी महिला संस्थेने. बुधवारी होणार्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भागिरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी आज कळंबा कारागृहात रक्षाबंधन सोहळा साजरा केला. बंदीजनांच्या हातावर राखीरुपी मायेचा धागा बांधला. आज तुमचे कुटुंब आणि बहिणी सोबत नसल्या म्हणून निराश होऊ नका. आम्ही आणि आमचा परिवार आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही भागिरथी संस्थेने बंदीजनांना दिली. सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकाराने आणि कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांच्या सहकार्याने झालेल्या या सोहळ्याने बंदीजन भारावले होते. यावेळी आर. एम. गवळी, भागिरथी संस्थेच्या ऐश्वर्या देसाई, सुनीता घोडके, दीप्ती पाटील, पुष्पा पोवार यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या