दिनांक२२:विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरमध्ये दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी इनोव्हेशन लॅबचा उद्घाटन सोहळा विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-पालक संघाचे सभासद व पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मा. फ्लाईट लेफ्टनंट श्री. मनोज जामसंडेकर आणि मा. श्री. विलास कर्जिणी ( एक्झिक्युटिव डायरेक्टर ऑफ के. आय. टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका शिल्पा कपूर व मा. उप-मुख्याध्यापिका मनिषा अंब्राळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती देवून त्यांचा यथोचित स्वागत-सत्कार करण्यात आला. तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने बनवलेल्या रोबोटिक कारचा वापर करून पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले व या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या डि. सी. मोटर कंट्रोल सिस्टीमने लॅबचे अनावरण करण्यातआले आणि एम. आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनीच बनवलेल्या अनलॉक सिस्टीमने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कु. नौमन अत्तार याने अनलॉक सिस्टीमसाठी वापरलेले एम. आय. टी. तंत्रज्ञान, कु. अथर्व जोशी याने पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी वापरलेली रोबोटिक कार, कु. पुरुषोत्तम टेंगशे याने उद्घाटनाच्या प्रसंगी वापरलेल्या अनलॉक सिस्टीमचे स्वरूप व कार्यप्रणाली विस्तृत स्वरूपात उपस्थितांना सांगितली. त्याचबरोबर कु. राधा वडुलेकर हिने विविध मानवी भावनांचे प्रदर्शन करणारा रोबोट तयार करून, त्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचीदेखील माहिती उपस्थित सर्वांना दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. झैद मोमीन यांनी इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स या विषयावर कार्यशाळा घेतली. पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताचे स्थान, या क्षेत्रात असलेल्या संधी व त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी याबाबतची माहिती देवून शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत गौरवोद्गार काढून शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
मा. मुख्याध्यापिका शिल्पा कपूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन करून इनोव्हेशन लॅबचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे केला जाईल व ‘साइफेस्ट’ या विज्ञान प्रदर्शनातही त्याचा वापर केला जाईल असे जाहीर करून विद्यार्थ्यांची त्यांच्या पुढील करीयरच्या दृष्टीने सातत्याने पूर्वतयारी करून घेतली जाईल अशी ग्वाही दिली.