कोल्हापूर दि 21:कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःख आणि मळमळ आहे. विकासाच्या केवळ गप्पा मारायच्या आणि आपणच खेळाडूंचे तारणहार आहोत, असा दिखावा निर्माण करणार्या माजी पालकमंत्र्यांची भुलवणारी कार्यपद्धती सर्वांनाच माहित आहे. खुनशी स्वभाव आणि राजकीय विद्वेषातून, या महाशयांनी आजवर अनेकांना धोका दिला आहे. म्हणूनच सूर्याजी पिसाळ ही त्यांना उपमा मिळाली. जवळपास १३ वर्षे उलटली, तरी कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा थेट पाईपलाईनचा प्रश्न अजुनही मार्गी लागलेला नाही. दरवेळी केवळ हवेतील आश्वासने द्यायची, तारखा द्यायच्या आणि परस्पर मागल्या दाराने ढपला पाडायचा, ही ज्यांची नीती आहे, त्यांनी विकासाच्या बाता मारू नयेत. आय आर बी कंपनीच्या माध्यमातून, कोल्हापूरवर टोल लादण्याचा कोणी प्रयत्न केला, हे सुध्दा सर्वांनाच माहित आहे. कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलेलं असताना, स्वत: टोलची पावती फाडून, माजी पालकमंत्र्यांनी ढपला पाडल्याची जाहीर कबुलीच दिली. त्यांना कोल्हापूरची जनता कधीच माफ करणार नाही. स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही. वास्तविक ज्या इनडोअर स्टेडियमबद्दल माजी पालकमंत्री आता बोलत आहेत, त्याचा निधी सुमारे दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजूर केला. मात्र दीड वर्षात कोणतेही काम झाले नसल्यानेच, हा निधी राज्य शासनाने खेळाडूंच्या अन्य विकास कामांसाठी वळवला. इनडोअर स्टेडियमच्या निधी स्थगितीचा निर्णय, राज्य शासनाने घेतला आहे. या निधीचा विनियोग, यापुढेही कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंच्या विकासासाठी आणि कल्याणासाठीच होणार आहे. या निधीतून कोल्हापूर शहरातील अनेक मैदानांचा विकास होईल. रुईकर कॉलनी, मेरी वेदर इथले मैदान, लाईन बाजार हॉकी मैदान, सासने मैदान मधील बॅडमिंटन कोर्ट आणि फुटबॉल मैदान, मंगेशकर नगर मधील फुटबॉल टर्फ अशा कामांसाठीच या निधीचा उपयोग होणार आहे. त्याबद्दलचा शासकीय अध्यादेश कुणालाही सहजपणे पाहता येईल. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणार्यांनी, आणि खेळाडूंबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणार्यांनी, किमान यापुढे तरी चुकीचे आणि खोटे बोलणे थांबवावे, असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला आहे.