– सामाजिक संस्थांना केली सढळ हाताने मदत.
कोल्हापूर प्रतिनिधी,
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बाळासाहेब दादासाहेब पाटील यांचे नुकतेच निधन झाले. बाळासाहेब यांचे दिवस कार्य घरच्या घरी करून पाटील कुटुंबीयांनी एकटी निराधार संस्था आणि अंधशाळा यांना आवश्यकतेप्रमाणे धान्य देऊन दातृत्वाचा वसा जपला.
बाळासाहेब दादासाहेब पाटील यांचे दोन ऑगस्टला वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. महापालिकेतून ते जकात निरीक्षक म्हणून निवृत्ती झाले होते. प्रपंच करावा नेटका या उक्तीप्रमाणे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने महापालिकेतील नोकरी करून आपल्या कुटुंबाचेही पालन पोषण योग्य पद्धतीने केले. एक मुलगी आणि दोन मुले यांना संस्कार आणि शिक्षण दोन्ही दिले. नोकरी मधल्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना सामाजिक जाणिवेचाही विसर पडला नाही. ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. रंकाळ्याच्या पिछाडीस असणाऱ्या हरिओम नगर मध्ये निवृत्तीनंतर ते स्थायिक झाले. या परिसरात वृक्षारोपण करणे, सांस्कृतिक हॉलची उभारणी, गणेश मंदिराची उभारणी यामध्ये त्यांचे सक्रिय योगदान होते. या भागात राहायला येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आवश्यकतेनुसार सर्व मदत केली. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी हरिओम नगर कला क्रीडा सांस्कृतिक मंचची स्थापना देखील केली. त्यांच्या या स्वभावामुळे या परिसरात ते दादा म्हणुन लोकप्रिय तर होतेच पण जबाबदार व्यक्ती म्हणूनही सर्वांच्या मनात त्यांचे आदराचे स्थान होते.
जन्म आणि मृत्यूचा फेरा कोणालाही चुकला नाही. दोन ऑगस्टला बाळासाहेब पाटील यांची प्राणज्योत मालवली. आपल्या वडिलांनी जगण्याचा उदात्त मार्ग आपल्याला दाखवला आहे. या भावनेतून त्यांच्या मुलांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली. बाळासाहेब पाटील यांचे दिवस कार्य त्यांनी छोट्या प्रमाणात आप्तजनांच्या उपस्थितीत केले. आणि मोठ्या मनाने व सढळ हाताने समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या एकटी, निराधार आणि अंधशाळेला त्यांच्या मागणीनुसार धान्य पुरवठा केला. वडिलांकडे असलेल्या सामाजिक जाणीवेतून मुलांनी पाटील कुटुंबीयांच्या दातृत्वाचा वसा आपल्या हाती घेतला. यापेक्षा अधिक कृतार्थ जीवन काय असावे…