दि. 12.08.2023:कोल्हापूर ते वैभववाडी या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची लवकरच बांधणी होण्याची स्पष्टता दिसत आहे. राष्ट्रीय नियोजन गटाच्या म्हणजेच, एलपीजीच्या 53 व्या बैठकीत, पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत, कोल्हापूर ते वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गाची शिफारस करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये, गोव्यात उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यामध्ये कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी गती मिळाली होती. त्यानुसार उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत, लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दौरा यांच्या अध्यक्षतेखाली, नवी दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत देशातील तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील कोल्हापूर ते वैभववाडी या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस करण्यात आली. या रेल्वे मार्गामुळे उद्योग व्यवसायाला तर चालना मिळणार आहेच, शिवाय औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला तसेच पर्यटनाला आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे अत्यंत सुलभ आणि किफायतशीर होणार आहे. पर्यायाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग अस्तित्वात येण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीचे फलित म्हणजे 53 व्या राष्ट्रीय नियोजन गटाकडून, पीएम गतिशक्ती अंतर्गत हा रेल्वे मार्ग तयार करण्याची शिफारस झाली आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश येत असून, लवकरच पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा रेल्वे प्रकल्प साकारणार आहे.