कोल्हापूर दि 10:राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीतून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाशी निगडित काही महत्त्वाचे मुद्दे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठ अंतर्गत एम पी एड, म्हणजेच मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन हा अभ्यासक्रम सुरू करण्याची विनंती, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना केली. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 नुसार, राज्यातील सर्व विद्यापीठांना एम पी एड कोर्स सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मात्र शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, असा कोर्स अजूनही सुरू झालेला नाही. वास्तविक हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून, मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन म्हणजेच एम पी एड कोर्स सुरू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, मास्टर इन फिजिकल एज्युकेशन हा कोर्स लवकरात लवकर सुरू करावा आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे केली. याशिवाय नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच, एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती सुरू करण्याबद्दलही खासदार महाडिक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे लक्ष वेधले. एन. एम एम. एस. शिष्यवृत्तीसाठी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनेक विद्यार्थी पात्र आहेत. मात्र काही वेळा तांत्रिक तर कधी अन्य कारणांमुळे, गरीब आणि होतकरू विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहतात. एन. एस. पी. पोर्टलवर वेळेत नोंदणी केली नसल्याने, बहुसंख्य विद्यार्थी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीला पात्र ठरत नाही. त्यामुळे कोरोना काळापासून अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबद्दलही संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि गरजू विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे केली. या दोन्ही मुद्द्यांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.