निधी खर्चूनही कामात सुधारणा नाही; “कुंपण शेत खात आहे काय?” : राजेश क्षीरसागर यांच्याकडून महापालिका अधिकारी धारेवर
कोल्हापूर, ०७ – शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर असून, अपुऱ्या यंत्रणामुळे कचरा उठावावर मर्यादा येत आहेत. कचरा उठावामध्ये अनियमितता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात डेंग्यू सारख्या आजारांनी युवकाचा बळी जाणं हे दुर्दैवी आहे. शहरात साथींच्या आजारांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करत आहे काय? केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे. तरीही कचऱ्याचे डोंगर कमी न होता वाढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. निधी खर्चूनही कामात सुधारणा नाही. निधीचा वापर कशासाठी केला जातोय? कुंपणच शेत खात आहे काय? अशी विचारणा करत कचरा व्यवस्थापनासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला. शहरातील कचरा उठाव, झूम प्रकल्पातील कचऱ्याचे वाढणारे डोंगर आणि कचऱ्यावर होणारी प्रकिया याबाबत श्री.राजेश क्षीरसागर यांनी लाईन बझार येथील झूम प्रकल्पाची पाहणी केली.
सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कचरा उठाव आणि निर्गतीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक नागरिकांनीही महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी यावेळी मांडल्या. बायोमायनिंग साठी सुमारे १९ कोटी निधी मंजूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह कचरा उठावाची ३० वाहने बंद असल्याचे निदर्शनास आले. यावर आक्रमक होत श्री.राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, झूम प्रकल्पातील कचरा गोळा करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तरीही याठिकाणाहून कचरा घेवून जाण्याचे काम खुलेआम चालू आहे. यामुळे पुन्हा याठिकाणाहून नेणाऱ्याच्या जीवितास धोका आहे. तरी तात्काळ यावर निर्बंध आणावेत. शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नाही. उठाव केलेल्या कचऱ्यावर वेळेत प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत. कोल्हापूरातील कचऱ्याची स्थिती मुंबई, दिल्ली सारख्या शहरांसारखी होवून बसली आहे. कचरा उठावातील अनियमितता यामुळे शहरात साथीचे रोग पसरत चालले आहेत. तीन दिवसांपूर्वी १८ वर्षाच्या तरुणाचा डेंग्यूच्या विकाराने मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांचे काम पाहता लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून कार्यतत्परतेने काम करावे. शहरात नियमितपणे औषध फवारणी करावी. झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ राबवा. १५ दिवसांनी याठिकाणी पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत कामात सुधारणा झाल्याचे दिसून आले पाहिजे. अन्यथा गय केली जाणार नाही. संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्जजीत घाटगे, आरोग्य अधिकारी विजय पाटील, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव आदी उपस्थित होते.