दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्यांच्या घटनांची मालिका सुरुच आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये तरुणाने आत्महत्या केल्यानंतर वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मृत्यू झाला. विजय आनंदा परीट या 32 वर्षीय युवकाने सोमवारी संध्याकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, चार वर्षांची मुलगी, वडील, भाऊ, भावजई असा परिवार आहे.
वयाची पस्तिशी सुद्धा पार न केलेल्या मुलाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने वडिल आनंदा परीट यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर घरात सन्नाटा पसरला असतानाच मंगळवारी दुपारी वडिल आनंदा खंडू परीट (वय 62) यांचे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे लेकाची राख थंड होण्यापूर्वीच वडिलांवरही अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. मुलाच्या आत्महत्येपाठोपाठ वडीलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजयच्या कपडे इस्त्रीच्या व्यवसायात वडील आनंदा परीट हे त्याला मदत करीत होते.