भन्नाट न्युज नेटवर्क
* सेवा रुग्णालयात जन औषधी दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर दि. 6 (जिमाका) : डॉक्टरांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून देताना रुग्णाला आवश्यक
मॉलिक्युल, कंटेन्ट लिहून द्यावा. जास्तीत-जास्त लोकांनी जेनेरीक औषधांचा उपयोग केला पाहिजे, यासाठी
आरोग्य विभागाने प्रयत्न करावा. वर्षातून एकदा जन औषधी दिन साजरा न करता आठवड्यातून एक दिवस
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणी रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी जिल्हा
परिषदेमार्फत सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण
यांनी केले.
7 मार्च जन औषधी दिनानिमित्त सेवा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास
उपसंचालक आरोग्य डॉ. प्रेमचंद कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील कुरुंदवाडे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे, अन्न व औषध निरीक्षक मनोज अय्या, जिल्हा मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.
गीता पिल्लाई, जेनेरिक असोसिएशनचे रवी बिडकर, सेवा रुग्णालयाचे डॉ. उमेश कदम उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णाला आवश्यक औषधांचे
मॉलीक्युल लिहून दिले, त्यातील कंटेन्ट लिहून दिले तर त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो रुग्ण ते औषध घेवू
शकेल. औषधे कोणती घ्यायची हा चॉईस रुग्णाचा असेल. शासनाने यासाठी मदत केली आहे. मेडिकल क्षेत्रातील
लोकांनीही याला मदत करणं गरजेच आहे. सामाजिक बांधिलकीपोटी आपण जास्तीत-जास्त जेनेरीक औषधांचा
वापर करायला हवा. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत जेनेरीक औषधे पोहचवा. त्यांचा या औषधांप्रति विश्वास
निर्माण व्हायला हवा. सर्व खासगी व शासकीय डॉक्टरांनी जेनेरीक औषधे असलेले प्रिस्क्रिप्शन लिहून दिले व
सर्वसामान्यांना ही औषधे उपलब्ध करुन दिली तर पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित जनसामान्यांना परवडणारी
औषधे उपलब्ध करुन देणे सार्थ होईल. सर्वसामान्य जनतेला परवडतील अशी औषधे उपलब्ध करुन देण्यात आपण
योगदान दिले पाहिजे. रुग्णालयातील उपस्थित सर्व रुग्णांना आज मोफत औषधे दिली जाणार आहेत याचा सर्वांनी
लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे
स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जन औषधी दिनानिमित्त
पालकमंत्र्याच्या संदेशाचे वाचन केले. अन्न व औषध निरीक्षक श्री. अय्या यांनी जन औषधांबद्दल माहिती दिली.
यावेळी सेवा रुग्णालयातील चार रक्तदाब व मधुमेही रुग्णांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते
एक महिन्याची जेनेरिक औषधे मोफत देण्यात आली.
आरोग्य उपसंचालक श्री. कांबळे म्हणाले, रक्तदाब, मधुमेह या आजारांचे प्रमाण जास्त आहे. 30 ते 40
टक्के रुग्ण या आजाराने पिडीत आहेत. याला आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे. या आजारांवरील खर्च सर्व
सामान्यांना न परवडणारा आहे. जेनेरीक औषधे प्रभावी असून त्याचा सर्वांनी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी
केले.
जिल्हा मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. पिल्लाई म्हणाल्या, रक्तदाब, मधुमेह या आजारांवरील
औषधांची किंमत जास्त आहे. या औषधांचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा आहे. त्यामुळे सर्वांनी
डॉक्टरांकडे जेनेरीक औषधं लिहून देण्याचा आग्रह धरायला हवा व सर्वसामान्यांपर्यंत जेनेरीक औषधे पोहचवायला
हवीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी तर आभार प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम
मदने यांनी मानले. यावेळी सेवा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व रुग्ण उपस्थित होते.