* कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक
* पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवणार
कोल्हापूर दि.24 (जिमाका): ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक
आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत
लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले
अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे
कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी प्रमुख उपस्थित
होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार विक्रम सावंत, आमदार शेखर निकम तसेच
विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय शेतीपद्धती तसेच
पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, प्राचीन काळी पंचतत्त्वांच्या संरक्षणाचे संस्कार प्रत्येकाला दिले जात
होते. परंतु, सध्या आपल्या भौतिक सुखासाठी मानव पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. हे काम कोणत्याही
जीवजंतूकडून होत नसून ते केवळ मानवाकडून होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापराने कॅन्सर
सारख्या भयानक रोगांना सामोरे जावे लागत असून येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट
होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रिय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन
कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ शासकीय यंत्रणेने नव्हे तर
प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. पंचमहाभूतांचे संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर
पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या ठिकाणी राबवण्यात येत असलेले पर्यावरण रक्षणाचे
विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या
कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.