भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): जिल्हा मराठी भाषा समिती व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,
कोल्हापूर मार्फत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन सोमवार, दि. २७ फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ९.३०
वाजता स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे करण्यात
आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, महिला, सार्वजनिक
ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय
शिंदे यांनी केले आहे.
ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान
दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव
म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन”
म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्ताने नामवंत मराठी साहित्यिक व समीक्षक
प्रा.डॉ. अविनाश सप्रे यांचे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले आहे. तसेच या कार्यक्रमात स्थानिक पातळीवरील लेखकांचा सत्कार करुन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या
डॉ. त्रिशला कदम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्य सचिव श्रीमती अपर्णा
वाईकर, गझलकार प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती श्रीमती वाईकर यांनी दिली
आहे.