भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): सामाजिक न्याय विभाग कार्यालयामध्ये तृतीयपंथी नागरिकांसाठी राखीव
स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय
कार्यालये आस्थापना, शाळा, महाविद्यालये याठिकाणी तृतीयपंथीयासाठी राखीव स्वच्छतागृहाची सुविधा
उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा तृतीयपंथी तक्रार
निवारण समितीचे सचिव विशाल लोंढे यांनी केले आहे.
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय कोल्हापूर येथे तृतीयपंथी नागरिकांसाठी राखीव
स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या राज्यस्तर सदस्या मयुरीताई
आळवेकर यांनी आभार मानले व समाजकल्याण कार्यालयाप्रमाणे इतर कार्यालयानेही या प्रमाणे कृती केल्यास
तृतीयपंथी नगरिकांस समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार उपलब्ध करुन देऊन त्यांना संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी
तसेच तृतीयपंथियांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे तसेच समाजकल्याण विभागाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व
कार्यालयाने तृतीयपंथियांना सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात, असे मत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण
पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कल्पना पाटील, सुरेखा डवर, नीलम गायकवाड व सचिन कांबळे उपस्थित होते.