कोल्हापूर – बोटनिकल गार्डन ऐवजी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी आज जुना बुधवार कृती समितीच्या वतीने आज को. म.न. पा. आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले. पंचगंगा नदी तीरावर राबाडेचे रान याठिकाणी महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा नियोजन मधून ४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करुन बॉटनीकल गार्डन उभा केले जात आहे. तथापि, काही यामधील खर्च त्याठिकाणी करण्यात आलेला आहे. मात्र नुकत्याच आलेल्या महापुरामध्ये हे पूर्ण बॉटनीकल गार्डन पुरामध्ये बुडाले होते. यामुळे तेथे आणलेले जैवविविधतेची रोपे, बैठक व्यवस्था, विद्युतीकरण, मचान अशी कामे पाण्यामध्ये बुडली गेलीत व शासनाचे याठिकाणी नुकसान झाले. या नुकसानीस जबाबदार कोण? आपल्या शहर अभियंत्यांना विचारले असता ते म्हणतात की, लावलेले वृक्ष १५ दिवस, या वृक्षांना कोणताही धोका निर्माण होत नाही असा दावा शहर अभियंता यांनी केला होता. याउलट महापालिका उद्यान समितीचे सदस्य जेष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक मधुकर बाचोळकर यांना हा दावा मान्य नाही. त्यांचे म्हणणे आहे की, जैवविविधता प्रकल्प हा या पंचगंगा तीरावर करणे हा चुकीचा आहे. असा त्यांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे दोघांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने जनतेची दिशाभूल करुन शासनाची फसवणूक होत आहे आणि या निधीचा याठिकाणी गैरवापर होत आहे. आणि सर्व नुकसान हे जनतेच्या खिशातील पैशाचा अपव्यय आहे. हाच प्रकल्प आपण अन्य दुसऱ्या ठिकाणी नेऊन तुम्ही कोल्हापूरच्या वैभवात भर टाकू शकता. पण याठिकाणी जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, या पेठांची महत्वाची मागणी मैदानाची आहे.
या भागामध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राऊंड नाही असे समितीने म्हंटले आहे.अनेकजणांना सराव करण्यासाठी बाहेरील मैदानाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असते. तसेच पंचगंगा नदीवर पेरुच्या बागेमध्ये आपले बागेचेच आरक्षण टाकले आहे. त्यालाच लागून पिकनीक पॉईंट हा महापालिकेचा बगीचा आहे. मग एकाच ठिकाणी तीन-तीन बागेचे आरक्षण टाकून महापालिकेला काय साध्य करायचे आहे? जो महत्वाचा आमचा मैदानाचा प्रश्न आहे, तो सोडविणेसाठी महापालिकेने प्रयत्न करावा आणि त्या बॉटनीकल गार्डनच्या जागेवर आम्हाला कायमस्वरुपी हक्काचे मैदान आरक्षण टाकून द्यावे ही आपणांस विनंती करतो, अन्यथा बॉटनीकल गार्डनच्या नावाखाली चाललेली पैशाची उधळपट्टी याविरोधात आम्ही तिव्र आंदोलन करुन काम थांबवू. तरी याची आपण गंभीर दखल घेवून त्वरीत हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जुना बुधवार कृती समितीने केली आहे.यावेळी धनंजय सावंत,सुशिल सुधाकर भांदिगरे,रणजित शिंदे, शशिकांत जाधव, गणेश जाधव, ,किसन पाटील अभिनित बुकशेट राजेंद्र तोरस्कर मुसाभाई कुलकर्णी किसन पाटील आदी उपस्थित होते.