कोल्हापूर दिनांक 11 – यातील तक्रारदार हे माहे जुलै २०२२ ते जुन २०२३ या दरम्यान पंढरपूर शाखेत लिपीक पदावर असताना १८५ दिवस त्यांनी लॉग-इन केले नसतानाही त्या दिवशी मस्टरवर हजर असल्याचे दाखवून त्या १८५ दिवसाचा पगार घेतला तसेच त्यांनी बँकेतून घेतलेल्या कर्जाचे ७ महिन्याचे हप्ते भरले नाहीत. अशा रितीने त्यांनी बँकेची फसवणूक केली असे आरोप ठेवून महाराष्ट्र राज्य परिवहन बँकेने त्यांना सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी लावली. त्या चौकशी करीता बँकेचे कोल्हापूर शाखेतील बँक निरीक्षक लोकसेवक राहूल पुजारी यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले.या चौकशीमध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व लवकरात लवकर चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी | लोकसेवक राहूल पुजारी यांनी तक्रारदारांकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १,६०,०००/- रुपयांच्या | लाचेची मागणी केली. पडताळणीपुर्वी तक्रारदाराकडून ५०,०००/- रुपये स्विकारल्यानंतरच लोकसेवक राहूल पुजारी यांनी तक्रारदार यांचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवून दिला.
त्यानंतर बँकेने दि. ३०/११/२०२४ रोजी तक्रारदार यांचे निलंबन रद्द करून सेवेत हजर करून घेवून, त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन बैंक शाखा, मुंबई सेंट्रल कार्यालय, मुंबई येथे नेमणुक दिली. परंतू त्यानंतर लोकसेवक राहूल पुजारी हे तक्रारदारांना उर्वरित १,१०,०००/- रुपये मागून आणून देण्यासाठी तगादा लावत आहे अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली आहे. सदर तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक राहूल पुजारी यांनी तक्रारदाराकडे त्यांचा चौकशी अहवाल लवकर आणि त्यांच्या बाजूने पाठविल्याचा मोबदला म्हणून १,१०,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम बँक ऑफ बडोदा समोर रस्त्यावर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर याठिकाणी स्विकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, लोकसेवक राहूल पुजारी यांचेविरुद्ध शाहुपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापुर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.