कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना ग्रामपंचायत स्तरावर गती येण्यासाठी ओडीएफ प्लस (ODF Plus ) 75 दिवसांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे. हे अभियान राबविण्याच्या सूचना त्यांनी गट विकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना दिली आहे. हे विशेष अभियान 10 जून ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीत पूर्ण करावयाचे असून या कामांचे वेळापत्रक तालुक्यांना देण्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2, ओडीएफ प्लस संकल्पनेंतर्गत पुढील प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ODF प्लस ही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. याकरीता पुढील निकषानुसार कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
शाश्वत हागणदारी मुक्त दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, दृश्य स्वच्छता, ओडीएफ प्लस जनजागृती संदेश या अंर्तगत आपल्या जिल्ह्यातील एकुण 921 गावे हागणदारीमुक्त झाली असुन यामध्ये 148 गावे मॉडेल, 771 गावे अॅस्पायरिंग झालेली आहेत. उर्वरीत 1 हजार 43 गावे मॉडेल व उर्वरीत 272 गावे हागणदरीमुक्त करावयाची आहेत. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाची प्रगती अत्यंत कमी असून या कामास गती प्राप्त होण्यासाठी व कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
1 हजार 43 गावे मॉडेल करणे व 272 गावे अॅस्पायरिंग करण्यासाठी ओडीएफ 75 दिवसांचे विशेष अभियान 10 जून ते 24 ऑगस्ट 2024 अखेर राबवायचे आहे. या विशेष मोहिमेमध्ये 5 हजार लोकसंख्येखालील गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे तसेच 5 हजार लोकसंख्येवरील गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करावीत. कामे पूर्ण झाल्यानंतर कामांचे फोटो एसबीएम 2.0 अॅप व्दारे जिओ टॅग करुन या गावांमध्ये ग्राम सभांचे ठराव करुन गावे ओडीएफ प्लस घोषित करण्यात येणार आहेत. तसेच 5 हजार लोकसंख्येवरील गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांची प्रशासकीय मान्यता पूर्ण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी दिली आहे.