कोल्हापूर, दि.29 (जिमाका): हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधांची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत, अशा सूचना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी केल्या.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच रमणमळा व राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्रांची पाहणी करुन झालेल्या कामांचा आढावा घेतला होता. आज 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्राची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी केली.
मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामांची श्री. शिंदे यांनी पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. मतमोजणीच्या कामात असणारे अधिकारी, कर्मचारी, तसेच मतमोजणीवेळी उपस्थित राहणारे उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सोयी सुविधा द्या. याठिकाणी विद्युत व्यवस्था, पंखे, सावलीसाठी मंडप, इंटरनेटसह संगणक आदी सोयी सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. निवडणुकीच्या निकालाची फेरीनिहाय आकडेवारी माध्यमांकडूनच नागरिकांपर्यंत पोहोचते, यासाठी निकालाची माहिती तात्काळ माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम, विद्युत, महसूल, पोलीस, जिल्हा माहिती कार्यालय आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.