कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ४८- हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी उपविभाग तसेच सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकी दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच ही सुट्टी साप्ताहिक सुट्टी रद्द करुन देण्यात येऊ नये,असे आवाहन इचलकरंजीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार अपवादात्मक परिस्थितीत कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांना आयुक्त, महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकाने घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने यांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने सूचनांचे योग्य ते पालन करण्याचे आवाहन श्रीमती मौसमी चौगुले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, इचलकरंजी यांनी केले.
उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.२. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक ०२३०-२४२१३९१ आणि ईमेल आयडी aclichalkaranji@gmail.com वर तक्रार दाखल करावी, असेही श्रीमती भोईटे यांनी कळविले आहे.