स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्या -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
*आयपीएस हर्षवर्धन बी.जे. व एमपीएससी 2023 रैंक 79 असलेले ओंकार बजागे मार्गदर्शन करणार
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व परीक्षार्थींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सत्र’ आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे. व महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023, रँक 89, श्री. ओंकार बजागे हे या मार्गदर्शन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यासाठी तसेच या परीक्षांमध्ये जिल्ह्यातील युवकांचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दर महिन्याच्या पाच तारखेला ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून दरमहा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आव्हानेही वाढत आहेत. बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी अपार कष्ट घेत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, त्याचे महत्व समजावे तसेच यातून महाविद्यालयीन विद्यार्थीही स्पर्धा परीक्षाकडे वळावे, याकरिता हा स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, यासाठीची तयारी आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होईल, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी दिली आहे.