• 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान शाहू मिल मध्ये महोत्सव
• विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रदर्शनीय कलादालने
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत बुधवार 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोल्हापुरातील बागल चौकातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कला दालनांचा समावेश असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे व नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राज्यभरातील प्रत्येक भागातील विविध कला, संस्कृतीचे प्रदर्शन घेणे तसेच लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन करणे व त्यांना चालना देण्यासाठी तसेच विविध कारागिरांच्या कलाकुसरीचे सादरीकरण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे.
शाहू मिल मध्ये होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात लोककला सादरीकरण, महाराष्ट्राच्या पाऊलखुणा, गौरव मायमराठीचा, दास्ता ए हिंदुस्थान, शाहिरी व लोककला सादरीकरण, जागर लोककलेचा, मुद्राभद्राय राजते, गाथा शिवशाहीची, गुढी महाराष्ट्राची, स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) हे कार्यक्रम सादर होणार आहेत.
महोत्सवात महाराष्ट्र संस्कृती दर्शन दालन, शिवकालीन आज्ञापत्रे व इतर पत्रव्यवहार दालन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन, गडकोट किल्ले छायाचित्र प्रदर्शन दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दालन, पारंपरिक वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबूकाम) दालन, कृषीविषयक उत्पादन दालन, पर्यटक विषयक दालन, हस्तकला प्रदर्शन (मातीकाम) दालन व ऐतिहासिक पुस्तके, ग्रंथ दालन अशी विविध कलादालने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहेत, या महोत्सवात आपण सहकुटुंब, सहपरिवार, नातलग व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी केले आहे.
महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण – दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व महाराष्ट्राच्या पाऊलखुणा सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.
दिनांक 1 फेब्रुवारी 2024 गौरव मायमराठीचा कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व दास्ता ए हिंदुस्थान सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व जागर लोककलेचा कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.
दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्राभद्राय राजते गाथा शिवशाहीची कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व गुढी महाराष्ट्राची कार्यक्रम सायं. 6 ते 9 वाजेपर्यंत.
दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.