कोल्हापूर, दि.31 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत सन 2023- 24 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्यास 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार यावर्षीच्या लाभासाठी केला जाणार नाही. तसेच यापूर्वी म्हणजे सन 2022-23 मध्ये ज्या बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत व बचत गट पात्र ठरलेले असल्यास अशा बचत गटांनी नव्याने केवळ अर्ज सादर करावा. जाहिरात सन 2023-24 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरुन प्राप्त होणारे उदि्दष्ट व तरतूदीच्या अधिन राहून देण्यात येत आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे-
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरुष किंवा महिलांचा असावा. बचत गटाची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती व कृषी विभागाकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतीलच असावेत. बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र. (तहसिलदार यांचे) बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त असावे व आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असावे. बचत गटातील सभासदाचे रेशन कार्ड ( एकाच कुटुंबातील एकच सभासद असावा) उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3 लाख 50 हजार रुपये राहील. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच 3 लाख 15 हजार रुपये शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच 35 हजार रुपये इतका असेल.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय विचारेमाळ, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231- 2651318 वर संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.