अंबाबाई मंदिरात शासनमान्य नोंदणी केंद्र सुरु करा
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : आयुषमान भारत मिशन योजनेचे कार्ड जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना वितरित करुन कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर बनवा, असे आवाहन आयुषमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी केले. हे कार्ड वितरीत करण्यात कोल्हापूर जिल्ह्याचे काम चांगले झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच शहरी भागातील काम वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
आयुषमान भारत योजनेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त आरोग्य अधिकारी संजय रणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुक देसाई तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुषमान (गोल्डन )कार्ड मध्ये कागल तालुका जिल्ह्यात अग्रेसर असून एकूण उद्दिष्टाच्या निव्वळ पत्र 1 लाख 14 हजार 653 पैकी 1 लाख 14 हजार 653(100 टक्के) कार्ड काढल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी फारुक देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. शेटे म्हणाले, येत्या काळात पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. आयुषमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचे कार्ड शहरातील अधिकाधिक नागरिकांना वितरित होण्यासाठी महानगरपालिकेने नियोजनबद्ध काम करावे. श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या विचारात घेवून या परिसरात हे कार्ड वितरित करण्यासाठीचे केंद्र सुरु करावे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, नॅशनल हेल्थ मिशनमध्येही जिल्ह्याचे काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. जिल्ह्यात या योजनेचे असमाधानकारक काम करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले.
येत्या काळात आयुषमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्याचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून यामुळे नागरिकांची सोय होण्याबरोबरच कामातील त्रुटी टाळल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित वैद्यकिय अधिकारी, प्रतिनिधींनी योजना राबवताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.