भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): कोतोली, ता. शाहूवाडी येथे एका अल्पवयीन बालक व बालिकेचा बालविवाह
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर व ग्राम बाल समिती, कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने रोखण्यात यश आल्याची माहिती
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावातील अल्पवयीन बालिका व अल्पवयीन बालक यांचा बालविवाह
कोतोलीमध्ये दि. 13 एप्रिल 2023 रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांना
मिळाली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून कोतोली गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर
सदस्य आणि गावचे ग्रामसेवक जीवन कदम यांना या घटनेबाबत कळविण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समिती
प्रतिनिधी यांनी विवाह होणाऱ्या बालकांच्या वयाची खात्री केली असता बालिकेचे वय १८ वर्षे ३ महिने व बालक
वय १७ वर्षे ११ महिने असल्याचे दिसून आले. मुलाचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांच्या आईवडिलांचे
समुपदेशन करुन विवाह थांबवण्यात आला.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम बाल संरक्षण समिती कोतोली
मधील प्रतिनिधी सरपंच दिलीप पाटील, पोलीस पाटील पांडुरंग कोळापटे व ग्रामसेवक जीवन कदम तसेच जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या जिल्ह्यामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण चालू आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत
आहे. यामुळे समितीमधील सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होवून त्या अधिक समर्थ राहून काम करत
आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाल विवाह होत असल्यास वेळीच थांबवता येणे शक्य होत आहे, असे जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले.