भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि.29(जिमाका) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा, ॲड. सुशिबेन शहा व सदस्य यांचा 28 ते 29 मार्च 2023 रोजी कोल्हापूर दौरा केला. त्यामध्ये 28 मार्च 2023 रोजी दौऱ्याचे पहिल्या दिवशी कोल्हापूर सातारा, सांगली या जिल्हयातील महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे प्रलंबित तक्रार प्रकरणांच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली. यामध्ये एकुण 28 प्रलंबित प्रकरणांची सुनावणी संपन्न झाली. प्रलंबित सुनावणी करीता तक्रारदार, पोलिस विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा पुनर्वसन विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
बाल हक्कांचा प्रचार व प्रसार व्हावा याकरीता समाजातील सर्व स्तरातील घटकांनी बाल हक्क संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर जिल्हयातील जेष्ठ नागरीक संघटना यांच्या सोबतही संवाद साधला असता, त्यांना बालस्नेही महाराष्ट्र करणेसाठी आयोगाच्या मोहिमेत सहभागी होणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास जेष्ठ नागरीक मंचाचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
बाल हक्कांचा प्रचार व प्रसार तसेच जनजागृती व बालरक्षक या मोहिमेची अंमलबजावणी करणेसाठी छत्रपती शाहू इन्स्टिटयुट बिझनेस एज्युकेशन ऍ़न्ड रिसर्च (CSIBER) महाविद्यालय कोल्हापूर येथील समाजकार्य विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचेशी संवाद साधुन आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या बाल रक्षक व बालस्नेही उपक्रमाबाबत ॲड.शहा यांनी मार्गदर्शन केले.
कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्हयातील अध्यक्ष व सदस्य, बाल कल्याण समिती व सदस्य, बाल न्याय मंडळ यांचेशी प्रत्यक्ष भेट घेवून CWC व JJB कडील प्रलंबित प्रकरणे व काम करताना येणाऱ्या अडीअडचणींचा बालकल्याण संकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे आयोगाकडून आढावा घेण्यात आला.
दि. 29 मार्च 2023 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे विविध शासकीय विभाग यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकी दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शाळामधील स्वच्छता गृहांच्या समस्येबाबत चर्चा करणेत आली असुन योग्य तो पाठपुरावा करुन निर्णय घेणेबाबत आयोगाचे अध्यक्ष सुशिबेन शहा यांनी सुचना दिल्या. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधुन विविध योजना अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, बालकांचा लसीकरणाचा अधिकार, शाळाबाह्य मुले, बालविवाह, विधी संघर्षग्रस्त बालके, HIV बाधित बालकांसाठी येणाऱ्या अडचणी, SJPU युनिट मधील अडचणी, सखी सावित्री समितीचे गठण करणे, शाळेतील Good Touch and Bad Touch , सॅनिटरी पॅड पुरवठा तसेच आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित समुपदेशकामार्फत समुपदेशन सेवा पुरवावी व शालेय फी बाबत खाजगी संस्था चालकांनी मुलांना व पालकांना वेठीस धरु नये याबाबत तात्काळ कार्यवाही करणेची सुचना श्रीम.शहा यांनी दिल्या.
कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्हयातील शासकिय व अनुदानित बालगृह अधिक्षक यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधुन अडचणी समजावुन घेतल्या तसेच अनुदानित बालगृहातील मुलांना जिल्हा पुरवठा विभागाकडुन वितरीत करणेत येणाऱ्या शासकिय अन्नधान्यात गहु, तांदुळ व डाळ पुरवठा होणेकामी प्रयत्न करणेबाबत आयोगाकडुन सुचना दिल्या. तसेच कोल्हापूर जिल्हयातील अध्यक्ष बार असोशिएशन, सचिव विधी सेवा प्राधिकरण व प्रमुख न्यायाधीश बाल न्याय मंडळ व बार असोशिएशनचे इतर जिल्हयातील प्रतिनिधी, वकील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधुन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या बाल रक्षक मोहिमेस सहकार्य करणेबाबत आयोगामार्फत आवाहन यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांचे दि. 28 ते 29 मार्च 2023 रोजी कोल्हापूर दौऱ्यामध्ये आयोगाच्या अध्यक्षा, श्रीम. सुशिबेन शहा, सदस्य- ऍ़ड. निलिमा चव्हाण, ऍ़ड. संजय सेंगर, ऍ़ड. जयश्री पालवे, श्रीम. सायली पालखेडकर , श्री. चैतन्य पुरंदरे , श्रीम. भोसले, श्रीम. कल्पना खंबाईत व श्री. लोंढे तसेच, कोल्हापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम. शिल्पा पाटील, व जिल्हा परिविक्षा अधिकारी सि.डी.तेली, सुहास वाईगडे, सागर डवरी व शरद गोजारे, कोल्हापूर शासकिय पुरुष राज्यगहृ आदी उपस्थित होते.