मुंबई, दि. 6 : गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली.
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे (महा हाऊसिंग), म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणीही वाढत आहे. राज्यातील प्रगतीपथावरील गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी.
ज्येष्ठ नागरिक धोरण २०२४, प्रधानमंत्री आवास योजना, गिरणी कामगारांना घरे, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.